‘टकाटक २’चं धम्माल टायटल साँग प्रदर्शित

मागील काही दिवसांपासून मराठीपासून हिंदी सिनेसृष्टीपर्यंत सगळीकडेच ‘टकाटक २’ या आगामी मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘टकाटक’ला मिळालेल्या तूफानी यशानंतर निर्माते आणि दिग्दर्शकांनी या चित्रपटाचा पुढचा टप्पा सिक्वेलच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेतल्यापासूनच प्रेक्षक ‘टकाटक २’ची आतुरतेनं वाट पहात आहेत. ‘टकाटक’प्रमाणेच ‘टकाटक २’देखील म्युझिकल कॅामेडी प्रकारात मोडणारा सिनेमा आहे. समाजात घडणाऱ्या घटनांवर विनोदी अंगाने भाष्य करताना मनोरंजक मूल्यांची सुरेख जोड देत सुमधूर संगीतरचना सादर करण्याचा फॅार्म्युला या चित्रपटाही वापरण्यात आला आहे. नुकतंच ‘टकाटक २’चं चार्टबस्टर टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आलं आहे.

लेखक-दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘टकाटक २’च्या टायटलप्रमाणेच याचं शीर्षकगीतही अगदी टकाटक बनलं आहे. ‘घे टकाटक दे टकाटक…’ असे या टायटल ट्रॅकचे बोल आहेत. गीतकार जय अत्रेनं ‘घे टकाटक दे टकाटक…’ हे गीत लिहिलं असून, गायक हर्षवर्धन वावरे आणि मुग्धा कऱ्हाडे यांनी आपल्या सुमधूर आवाजात गायलं आहे. संगीतकार वरुण लिखते यांनी या गीताला स्वरसाज चढवण्याचं काम केलं आहे.

‘टकाटक २’चा टायटल ट्रॅक संगीतबद्ध करण्याचा अनुभव शेअर करताना वरुण म्हणाले की, चित्रपटाच्या कथानकाला साजेसं टायटल आणि टायटलला साजेसं टायटल ट्रॅक असणं खूप महत्त्वाचं असतं. गीतकार जय अत्रे यांनी अतिशय समर्पक शब्दांमध्ये शीर्षक गीत लिहिलं असून, हे शीर्षकगीत चित्रपटाचा आत्मा ठरावा असं आहे. कथानकाला पूरक आणि दिग्दर्शकांना अपेक्षित असणारं असं हे गीत आहे. हर्षवर्धन वावरे आणि मुग्धा कऱ्हाडे हे आजच्या पिढीतील टॅलेंटेड गायक आहेत. त्यांनी या गाण्यात लिहिलेल्या शब्दांना अचूक न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणाईसोबतच सर्वच वयोगटातील रसिकांना भावेल असं संगीत या गीताला लाभलं आहे. ‘टकाटक २’च्या टायटल ट्रॅकचं संगीत काहीसं वेगळं असल्याचं संगीतप्रेमींना ऐकताना नक्कीच जाणवेल. या गाण्याच्या निमित्तानं काही वेगळे प्रयोग करण्याचं धाडस केलं असून, ते रसिकांना नक्कीच आवडेल अशी आशा आहे.

‘टकाटक २’मध्ये प्रथमेश परब, प्रणाली भालेराव, अजिंक्य राऊत, अक्षय केळकर, भूमिका कदम, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजशेखर , किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून केलेली धमाल-मस्तीही या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळेल. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांचीच मूळ संकल्पना असलेल्या ‘टकाटक २’ची कथा-पटकथाही त्यांनीच लिहिली आहे. किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी प्रसंगानुरूप संवादलेखन करण्याचं काम चोख बजावलं आहे. सिनेमॅटोग्राफी हजरत शेख वली यांनी केली असून, अभिनय जगताप यांनी पार्श्वसंगीत देण्याची जबाबदारी योग्य रितीनं पार पाडली आहे. निलेश गुंडाळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

‘टकाटक २’ निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओने, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, नरेश चौधरी, आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

१८ ऑगस्ट रोजी ‘टकाटक २’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Share your valuable opinion

%d bloggers like this: