बिर्यानी ते फिरनी! कसा असतो रमजानच्या महिन्यातील लज्जतदार जेवणाचा थाट?

मुंबई आणि स्ट्रीट फूड यांचं एक वेगळं आणि घट्ट नातं आहे. रमजानच्या महिन्यात मुंबईत एक वेगळाच नूर असतो. रमजानच्या महिन्यात खास मिळणारे पदार्थ चाखायला मुंबईमधल्या मोहम्मद अली रोडला नक्की भेट द्या. पण इथे असं नक्की आहे काय ज्यासाठी तुम्ही खास एक दिवस काढून इथे गेलं पाहिजे?

•कोविडनंतर पुन्हा सजणार


रमजान म्हणलं की डोळ्यासमोर येते ती असंख्य चमचमीत पदार्थानी भरलेली खाऊगल्ली. वेगवेगळ्या गोड, तिखट शाकाहारी, मांसाहारी पदार्थांची रेलचेल असलेल्या ह्या गल्लीत अक्षरशः हरवून गेल्यासारखं होतं. तब्ब्ल दोन वर्षांनी ह्या गल्लीला पुन्हा त्याच्या आधीच्या आणि जिवंत रूपात बघता येणार असल्याने खाद्यप्रेमींच्या आनंदाला उधाण आलं आहे.

संध्यकाळचा नमाज अदा करून आणि दिवसभराचा उपवास सुटल्यानंतर म्हणजेच सूर्यास्तानंतर सुरु होणारे खाण्याचे स्टॉल रात्री उशिरापर्यंत चालू असतात. इथे मन भरून खायला येणाऱ्यांची रीघ कमी होत नाही. विशेषतः मोहम्मद अली रोडच्या मिनारा मस्जिदजवळ सुरु होणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल खूप लोकप्रिय आहेत.

•फूडीज् चा आवडता स्पॉट!


तुम्हाला जर मांसाहारी जेवणाची आवड असेल तर स्वर्गीय सुखाचा अनुभव घ्यायला तयार व्हा. मटण, चिकनचे वेगवेगळे अप्रतिम पदार्थ चाखण्यासाठी तुम्हाला अख्खी संध्याकाळ सुद्धा कमी पडेल एवढ्या पद्धतीचे पदार्थ इथे उपलब्ध आहेत. मटण गुर्दा, हलीम, मटण कबाब, चिकन तंदूरी, मलई चिकन, पहाडी चिकन, ड्राय चिकन, चिकनची चमचमीत रस्सा भाजी आणि रुमाली रोटी अश्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या पदार्थांची इथे रेलचेल आहे.

त्याशिवाय गोड पदार्थ प्रेमींनी अर्थात ज्याला इंग्रजीत sweet tooth असं म्हणतात अश्यानी विशेष या जागेला भेट द्यावी. जन्नतचा म्हणजे अक्षरशः स्वर्गीय सुखाचा आनंद देणारे गोड पदार्थ मोहम्मद अली रोडची खासियत आहे. फिरनी, गरमागरम मालपुआ, रबडी, रसगुल्ले आणि अशी न संपणाऱ्या गोड पदार्थांची यादी… हे सगळं मोहम्मद अली रोडवर तुम्हाला खायला मिळू शकतं. सुलेमान मिठाईवाला, मॉडर्न स्वीट्स अश्या क्लासिक ठिकाणी तुम्ही जाऊ शकता.

साधारण सात वाजल्यानंतर मोहम्मद अली रोडच्या गल्लीला वेगळाच रंग चढायला लागतो. जवळपासच्या डोंगरी, भेंडी बाजार, नागपाडा हे भाग सुद्धा रोषणाईने सजायला लागतात.

रमजान हा महिना सगळ्यांचा आहे. इथे देशभरातून लोक अप्रतिम जेवणाचा आस्वाद घ्यायला येतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे जेवण! त्यात कोणत्याही प्रकारचा भेद नाही. खाद्यसंस्कृती ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यांना एकत्र आणते. तुम्हालाही जर पोटाची भूक भागवायची असेल तर इफ्तारच्या वेळी दिव्यांच्या झगमगाटात नटलेल्या मोहम्मद अली रोडला अवश्य भेट द्या.

लेखन-रसिका नानल
फोटो सौजन्य- गुगल
आणि Ganesh Vanare https://www.instagram.com/haram_khor_/

Share your valuable opinion

%d bloggers like this: