The importance of mental health in today’s world- मेंटली फिट रहा

मानसिक आरोग्य जपण्यासाठी हे नक्की वाचा!!

माणसाची स्टेबिलिटी कोणत्या गोष्टींवरून ओळखता येईल?एखादी व्यक्ती स्थिर आहे हे त्याच्या कामावरून, पैश्यांवरून, बोलण्यावरून ओळखणं कितपत शक्य आहे असं वाटतं?आयुष्यात अनेक गोष्टींचा आव आणता येतो, पण माणूस आंतरमनातून ठीक नसेल तर तो कधीच आनंदी असण्याचा आव आणू शकत नाही. हे आंतरमनातून ठीक असणं, आनंदी आणि सकारात्मक राहणं हे सगळं एवढं गरजेचं का आहे असं अनेकांना वाटत असेल. पण काही वेळा काही गोष्टी आपल्या हातात नसतात. अनेकदा ओढवलेली परिस्थिती माणसाला इतकं हतबल करते की त्याचा मानसिक ताण सहन करणं हे असह्य होतं.

आजच्या धावत्या जगात मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत कमी विचार केला जातो. माणसांना असलेल्या समस्या बरेचदा दुर्लक्ष करून सोडून दिल्या जातात आणि त्याचा आलेला ताण सहन करणं अशक्य होतं. आपल्याकडे एखाद्या मुद्द्याला एकतर सोयीस्कर पद्धतीने स्वतःचा फायदा करून घ्यायला वापरलं जातं किंवा मग त्याचा प्रचंड प्रमाणात बाऊ करून तो विषय एका काळानंतर बाजूला सारला जातो. मानसिक आरोग्य चांगलं ठेवा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचायला आपल्याला एखाद्या विशिष्ट लोकप्रिय माणसाची आत्महत्या व्हायची वेळ का यावी लागते? एखाद्याच्या आत्महत्येनंतरच आपल्याला जाग का येते? मग अचानक सगळीकडे मानसिक त्रास, ताण, नैराश्य ह्यावर बोलायला अनेकजण जागे होतात. प्रत्येकजण दुसऱ्यासाठी उभे राहा असा संदेश पोहोचवत असतो, पण खरंच एखाद्याच्या हक्काचासाठी खांदा होताना आपण तेवढी जबाबदारी पार पाडायला समृद्ध आहोत का ह्याचा विचार होणं गरजेचं आहे. समोरचा त्याच्या समस्या आपल्यासमोर मांडत असताना त्याला कम्फर्टेबल वाटेल असं वातावरण निर्माण करणं आणि मुळात समोरच्या व्यक्तीबद्दल मनात कोणतेही विचार,शंका न ठेवता त्याला बोलण्याची मोकळीक देणं हे एक माणूस आणि चांगला श्रोता म्हणून आपण केलं पाहिजे.

एखाद्याच्या मानसिक आरोग्याच्या चर्चा करताना आपण ज्या व्यक्तीला एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी दोषी ठरवतो आणि त्याच्याबद्दल आपल्याकडे योग्य माहिती नसतानाही अर्वाच्य भाषेत बोलतो तेव्हा त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर किती जास्त परिणाम होत असेल ह्याचा सुद्धा अंदाज घेतला पाहिजे. माणूस म्हणून प्रत्येक बाजूला तोलून त्याचा संबंधित बोलताना सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील राहून मत व्यक्त केलं पाहिजे.

लॉकडाऊन आणि एकीकडे असलेलं कोरोनाच सावट या सगळ्यात आपण कुठेतरी हतबल होऊन जातोय. पण हे न करता मोठ्या हिंमतीने आपण आपली शारीरिक काळजी तर घेतली पाहिजे पण सोबतीने मानसिक काळजी देखील घ्यायला हवी. या काळात अनेकांना आलेलं डिप्रेशन आणि त्यातून अनेक घडामोडी या आपण रोजच्या आयुष्यात ऐकत असतो या सगळ्या परिस्थितीत घाबरून न जाता आपण आपलं मानसिक स्वास्थ्य जपलं पाहिजे. शारीरिक स्वास्थ्य तर आपण सगळेच जपतोय पण मानसिक संतुलन बिघडू न देता रोजच्या आयुष्यात तुम्ही तुमचं मानसिक स्वास्थ्य तितकंच योग्यप्रकारे जपलं पाहिजे.

सध्याच्या परिस्थितीत आपण असुरक्षित आणि अनिश्चितेत जीवन जगत आहोत. तणाव आणि नैराश्याने दैनंदिन जीवनात मानसिक संतुलन मिळवणं कठीण झालंय. म्हणून शारीरिक फिटनेस बरोबरच मानसिक आरोग्य जपण्यासाठी काही खास टिप्स सांगतात मानसशास्त्र तज्ज्ञ हेमांगी म्हाप्रोळकर..

१) रोजच्या जीवनात अनेक गोष्टींना आपण सामोरं जातोय तर एका वेळी एकाच गोष्टीचा विचार करा. भविष्यात काय होणार याचा विचार न करता आता जे आयुष्य जगतोय ते आनंदात जगायला शिका.

२) आर्थिक सुरक्षेसोबत मानसिक सुरक्षेला तेवढच प्राधान्य द्या.

३) सध्या आपण सगळेच वर्क फ्रॉम होम करतोय तर यासाठी शरीराला योग्य तेवढी झोप द्या. झोप टाळू नका. रात्रभर जागून सकाळी लवकर उठणं टाळा.

४) तुमच्या अडचणी विषयी तुमच्या जवळच्या लोकांशी संवाद साधा. जेणेकरून तुम्हाला तुमचं मन हलकं करण्यासाठी मदत होईल.

५) बिंग वॉच करणं टाळा. एखादी नवीन सीरिज किंवा चित्रपट आला तर खरंच बिंग वॉचिंग करू नका. जर तुमचा स्क्रीन टाईम वाढला तर तुमचा आजूबाजूच्या व्यक्ती सोबत वेळ घालवणं कमी होत तर या गोष्टी करू नका.

६) आपल्या धावपळीच्या जीवनात आपल्या जवळच्या लोकांना नक्की वेळ द्या त्यांचा सोबत बोलून वेळ घालवा.

मानसिक संतुलन जपणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच आहे. त्यामुळे अश्या छोट्या गोष्टी तुम्ही करून आपल्या जवळच्या लोकांशी बोलून तुमचं मानसिक स्वास्थ्य जपू शकता. १० ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगात ‘मेंटल हेल्थ डे’ म्हणून साजरा केला जातो. आजच्या या धावपळीच्या जगात तुम्ही सुद्धा तुमचं मानसिक स्वास्थ्य जपून फिट रहा.

नेहा कदम, रसिका नानल (प्लॅनेट मराठी)

Share your valuable opinion

%d bloggers like this: