आवाजांचा जादूगार : संकेत म्हात्रे

छोट्या पडद्यावरील कार्टून मालिका असो, किंवा विविध वाहिन्यांचे माहितीपर कार्यक्रम…व्हॉइसओव्हर आर्टिस्ट संकेत म्हात्रेचा आवाज नेहमी तुमच्या कानांवर पडतं असतो. त्याच्या आवाजाची जादू काही औरच आहे. छोट्या पडद्यापासून ते हॉलीवूडपर्यंत अनेक व्यक्तिरेखांचा ‘बोलविता धनी’ असणाऱ्या संकेत म्हात्रे विषयी जाणून घेऊयात महाराष्ट्र दिनाच्यानिमित्ताने..

संकेत म्हात्रे आणि त्याने आवाज दिलेली पात्र

छोट्या दोस्तांच्या आवडीच्या ‘छोटा भीम’मधल्या जग्गू माकडाचा इंग्रजीतील संवाद असो, ‘बेनटेन’मधला नायक ‘बेन’चा आवाज असो किंवा ‘अॅव्हेंजर्स’मधला ‘थॉर’चा हिंदी भाषेतील संवाद असो.. या आणि अशा अनेक आवाजांमागे आहे संकेत म्हात्रे हे मराठमोळ नावं. व्हॉइसओव्हर आर्टिस्ट म्हणून सर्वश्रूत असलेल्या संकेतचा आवाज विविध कार्यक्रम आणि चित्रपटांतून आपल्या कानांवर पडतं असतो. लहानग्यांच्या लाडक्या कार्टून्सपासून ते दाक्षिणात्य चित्रपट आणि हॉलीवूडच्या डब केलेले  विविध चित्रपट वेगवेगळ्या आवाजात आणि भाषांमधून आपल्यापर्यंत पोहचत असतात. कित्येकदा पडद्यावर दिसणाऱ्या चेहऱ्यांचा खरा आवाज पडद्यामागेच राहतो. पण, त्यातले काही आवाज मात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. त्या अनेक आवाजांमागील एक मराठमोळा चेहरा म्हणजे संकेत म्हात्रे.

कॉलेजमध्ये असल्यापासूनच संकेताला नाट्यक्षेत्राची आवड होती. त्याने इलेक्ट्रोनिक्स अँन्ड व्हिडीओ इंजिनिअरींग केलं. परंतु, मन मात्र त्यात रमत नव्हतं. म्हणून त्याने ‘बँड जॅमिंग आणि व्हॉइस स्टुडीओ’ची सुरुवात केली. त्यावेळी तो स्टुडीओची व्यवस्था सांभाळत असे. एके दिवशी रेकोर्डिंगला व्हॉइसओव्हर आर्टिस्ट न आल्यामुळे केवळ वेळ निभाऊन नेण्यासाठी संकेतनं पोपटाच्या पात्राला आवाज दिला. त्या टीमला संकेतचा आवाज आवडला आणि त्यांनी त्याचं कौतुकही केलं. त्यातून संकेतच्या डबिंगच्या कामाचा श्री गणेशा झाला. मग दीड वर्षांतच त्याने स्टुडिओ बंद करून स्वतःला संपूर्णपणे आवाजाच्या दुनियेत झोकून दिलं.

डबिंगच्या दुनियेत काम करताना सुरुवातीचे काही दिवस खडतर होते. त्यावेळी काम करताना त्यातून शिकणं आणि स्वतःला घडवणं यावर संकेतच अधिक लक्ष असे. त्यावेळी ‘बेनटेन’ या कार्टून सिरीजमधील एका खलनायक पात्राच्या ऑडिशनसाठी संकेतला बोलावण्यात आलं. त्याचा आवाज ऐकून याचं मालिकेतील मुख्य नायक असणाऱ्या ‘बेन’ या पात्रासाठीही त्याची ऑडिशन घेण्यात आली आणि त्यासाठी त्याची निवडही झाली. ही त्याची पहिली मोठी अॅनिमेटेड मालिका ठरली. त्यानंतर संकेतने अनेक देशी-विदेशी कार्टून्ससाठी आवाज दिला. याच मालिकेतील नायकाने हातातील घड्याळातील कळ दाबल्यानंतर तो नायक दहा वेगवेगळ्या एलिअनची रूप घ्यायचा त्या दहाही एलिअन्सना संकेतने आवाज दिला आहे. त्यामुळे हे काम त्याच्यासाठी स्पेशल असल्याचं संकेत सांगतो.

लोकप्रिय कार्टून ‘छोटा भीम’ मधील जग्गू माकडाच्या इंग्रजी भाषेतील संवादासाठीही संकेतनं आवाज दिला आहे. चित्रपटांसाठी आवाज देणं सुरु झाल्यावर ‘ग्रीन लँटर्न’ या चित्रपटाचा नायक अभिनेता रायन रेनॉल्डसला त्यान पहिल्यांदा आवाज दिला होता. त्यानंतर अनेक चित्रपटांना आवाज देण्याची संधी मिळाल्याचं तो सांगतो. संकेतनं हॉलीवूडपटांपैकी अनेक आवाज आता अधिकृतपणे द्यायला सुरुवात केली आहे. त्याच्या ‘डेडपूल’ या चित्रपटानं त्यावेळच्या हिंदी चित्रपटांवर मात केली होती. संकेतनं आत्तापर्यंत कार्टून्ससाठी, डिस्कवरी चॅनलवर १५ वर्ष वयोगटापासून काही चित्रपटांत ६०-६५ या वयोगटातल्या पात्रांसाठीसुद्धा आवाज दिला आहे. ‘टीएलसी’साठी जेमी ऑलिव्हरला संकेत गेली काही वर्ष आवाज देतो आहे. तर बेअर ग्रील्सला दिलेला आवाज हा संकेतच्या अनेक प्रसिद्ध आवाजांपैकी एक. चित्रपटात कथानकाचा तोल सांभाळावा लागतो तर, अनेक माहितीपर कार्यक्रमात समंधित माहिती योग्य शब्दात पोहचवण अपेक्षित असतं. डबिंगचं काम संकेताला मनापासून आवडतं आणि त्याने आवाज दिलेल्या कार्टून्सची मिनी गॅलरीही त्याच्या घरी आहे. २०१९ चा ‘बेस्ट ऑडीओ बुक पुरस्कार’ तर २०२० च्या इंडिया व्हॉईस फेस्ट तर्फे दिल्या जाणाऱ्या ‘बेस्ट डबिंग लाइव्ह अॅक्शन’ विभागात संकेताला पुरस्कार मिळाला आहे.      

मजेशीर माझं काम..

ज्या व्यक्तिरेखेला आवाज द्यायचा असतो, त्याच्या आवाजाच्या लकबीचा विचार करून त्याला आवाज द्यायचा माझा प्रयत्न असतो. आवाज देण्याच्या कामाच्या बाबतीत मिळणाऱ्या स्वातंत्र्याबाबतीत विचार केल्यास, कार्टून्सना आवाज देण्यात अधिक स्वातंत्र्य मिळतं आणि तेवढीच मजाही येते.

-संकेत म्हात्रे (व्हॉइसओव्हर आर्टिस्ट)

मुलाखत : अजय जयश्री उभारे ( प्लॅनेट मराठी )

Share your valuable opinion

%d bloggers like this: