Trendy Digital Cartoonwala – Siddhanth Narvekar

डिजिटल कार्टूनवाला

आधीच्या काळात व्यंगचित्रातून एखाद्या विषयांवर भाष्य केलं जायचं पण काळासोबत माध्यमं बदलत गेली. आज अनेक व्यंगचित्रासोबत आपण अनेक मजेशीर डिजिटल कॉमिक्स बघतो. सोशल मीडिया वर सध्या अश्या अनेक डिजिटल कॉमिस्क ची चर्चा आणि ट्रेंड बघायला मिळतो.

आज आपण अश्याच एका वेब कॉमिक ला भेटणार आहोत “सिद्धांत नार्वेकर” ज्यांच्या कार्टून्स च्या सोशल मीडियावर चर्चा रंगताना आपण सगळेच बघतोय. कोण आहे हा वेब कॉमिक आणि त्यांच्या या वेब कॉमिक आणि कार्टुनिस्ट चा प्रवास त्याच्या कडून जाणून घेऊयात!

सिद्धांत नार्वेकर (वेब कॉमिक आणि प्रॉडक्ट डिजायनर)

“संदेश देणारे कार्टून्स” 

मी कुठेही कार्टून शिकलो नाही. जे काही मी आत्ता पर्यंत करत आलो आहे ते मला एका स्टोरी सारखं वाटायचं. २०१८ मध्ये मी “siddtoons” हे पेज सोशल मीडिया वर सुरू केलं या मागचा उद्देश हाच होता की लोकांचे मजेशीर चेहेरे रेखाटता येतील आणि हे करता करता कॉमिक्स् बनवायला लागलो. सहा महिने कॉमिक्स् करून मला कळलं हे तर सगळेच करतात मग मी तेच मजेशीर चेहेरे वापरून लोकांच्या लग्नाच्या पत्रिकेसाठी बनवायला लागलो. याला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आपण एखादं काम सुरू केलं की लोकांच्या आपल्या कडून अपेक्षा वाढत जातात आणि मग यातून जाणवलं की बाकी आर्टिस्ट सुद्धा या क्षेत्रात खूप काम करतात मग काहीतरी वेगळं करावं या उद्देशाने मी माझ्या कार्टून मधून काहीतरी लोकांना मेसेज जाईल असे कार्टून्स बनवायला सुरुवात केली.

“आणि कार्टुनिस्ट झालो” 

२०११ पासून मी पोर्ट्रेट पेन्सिल आर्टिस्ट करत आलो आहे या नंतर MIT मध्ये जाऊन मी डिजिटल आर्ट शिकलो. माझी एक मैत्रीण बंगलोर वरून मला भेटायला आलेली तेंव्हा गप्पा मारताना तिने मला सहजपणे असचं कार्टून्सच एक पेज सोशल मीडिया वर चालू करण्याची कल्पना दिली. मग म्हंटल करून बघूया म्हणून २०१८ ला मी हे पेज सुरू केलं आणि त्या नंतर लोकांचा मिळणार भरघोस प्रतिसादामुळे कार्टूनिस्ट म्हणून मजेशीर प्रवास सुरु आहे.

“हॅन्डमेड ते डिजिटल आर्ट वर्क” 

हॅन्ड मेड आणि डिजिटल ही दोन्ही काम दोन वेगवेगळी टोक आहेत. हॅन्डमेड मध्ये खूप मेहनत आहे. ग्राहकाने जर काही बदल सांगितले तर ते करण्यात खूप वेळ जातो तसचं डिजिटल मध्ये ते सोप्प्या पध्दतीने होऊन जातं. हॅन्डमेड कामात झालेली चूक पूर्ण नवीन आर्ट वर्क करायला भाग पाडते पण डिजिटल मध्ये ते सोप्पं होऊन पटकन चूक सुधारून करता येत. माझ्यासाठी दोन्ही कामं ही सारखी आहेत. डिजिटल आर्ट करून कंटाळा आला की हाताने स्केच करायला एक वेगळीच मज्जा येते. 

“म्हणून सकारात्मक विषय निवडतो” 

कार्टून्स करण्यासाठी मी असे विषय निवडतो ज्यातून लोकांना काहीतरी सकारात्मक बघायला मिळेल. सकारात्मक विषय आणि ह्युमर या दोन गोष्टींचा मिलाफ करून एखादं कार्टून घडवण्यात खरी गंमत आहे. एखाद्या ट्रेंडीग विषयावर कार्टून करायचं ठरवलं तर त्या विषया बद्दल थोडं वाचून आपल्याला यातून काय कल्पक आणि वेगळं मांडता येईल याचा विचार  करून मी आर्ट वर्क करतो. हल्ली लोकांना भलेमोठे कॅप्शन वाचायला कंटाळा येतो तर अश्या वेळी योग्य संदेशासोबत त्याला चांगल्या ह्युमर ची साथ लाभली तर त्यातून नक्कीच छान काहीतरी कार्टून्स घडवण्याचा माझा प्रयत्न असतो आणि मग ते जास्त लोकांपर्यंत पोहचतं. जर आपल्याला आपल्या कामातून एखादा संदेश द्यायचा असेल तर ते नक्कीच कल्पकविचारांनी लोकांसमोर मांडलं तर ते लोकांना जास्त भावतं असं मला वाटतं.

“बदलती माध्यमं आणि बरंच काही”  

  आधीच्या काळात सुद्धा कार्टून्स असायची. व्यंगचित्र ही एखादया व्यक्ती आणि त्या परिस्थिती पुरती मर्यादित राहतात. हल्ली कार्टून्स ही व्यंगचित्राच्या सोबतीने लोकं बघतात. एवढचं की ते माध्यम डिजिटल झालंय आधी लोकं हाताने कार्टून्स काढत असत आता ते डिजिटली काढतात. तंत्रज्ञान आलं तशी ही माध्यमं बदलत गेली आणि आता सुद्धा व्यंगचित्राच्या सोबतीने खूप मोठ्या प्रमाणात कार्टून्स काढली जातात. कार्टून्स डिजिटल झाली आणि त्यातून योग्य असा सकारात्मक संदेश लोकांपर्यंत पोहचू लागला. 

“आवडते कार्टुनिस्ट” 

  सर आर. के. लक्ष्मण अनी सर मारिओ मिरांडा.

“सोशली प्रतिसाद”

सोशल मीडियावर खूप छान प्रतिसाद मिळतो. एक प्रश्न नेहमी लोकं मला विचारतात की या मागची ट्रिक काय आहे? तर ट्रिक वगैरे असं काही नसतं ज्या विषयावर कार्टून करायचा त्याचं मजेशीर रूप लोकांना कार्टून्स च्या माध्यमातून दाखवता येतं. कार्टुन हे अचूक आणि कल्पक असावेत असं मला वाटतं. फक्त आपल्या कार्टून्स मधून समाजाला योग्य तो संदेश द्यायला येता हवा. 

मुलखात : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)

Share your valuable opinion

%d bloggers like this: