मोठ्या उत्साहात पार पडला ‘वऱ्हाडी वाजंत्री’ सिनेमाचा भव्य प्रिमिअर शो!

बहुचर्चित मल्टिस्टारर ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटाचा दिमाखदार भव्य प्रिमियर शो मुंबईतील सिटीलाईट चित्रपटगृहात बँडबाजाच्या ठेक्यावर तालासुरात संपन्न झाला. विनोदाच्या षटकार चौकारांसह ‘वऱ्हाडी वाजंत्री’च्या कलाकारांनी या प्रिमिअर सोहळ्याची शोभा वाढवली. ‘वऱ्हाडी वाजंत्र्यांच्या स्वागतासाठी खास ‘बँड पथक सज्ज होते. त्यांच्या सुरावटीत तल्लीन होऊन उपस्थित सगळ्याच कलावंतांनी अनोखा ताल धरत नवचैतन्य निर्माण केले होते. ‘वऱ्हाडी वाजंत्री’चा हा भव्य देखणा सोहळा पाहताना मुंबईकर रसिक प्रेक्षकांचे भान हरपून गेले होते. चित्रपटगृहात प्रवेश करण्यापूर्वी बँडच्या सुरांनी आणि कलाकारांच्या बहारदार नृत्याने चित्रपटगृहाचा परिसर दणाणून गेला होता.

या प्रिमिअर सोहळ्याला चित्रपटातील प्रमुख कलावंत विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळे, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे-केंडे, आनंदा कारेकर, प्रभाकर मोरे, शिवाजी रेडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे, दिग्दर्शक विजय पाटकर, निर्माते कॅप्टन कल्पेश मगर, सहनिर्माते अतुल राजारामशेठ ओहोळ, वैभव परब, गिरीश कोळपकर, इंदुराव कोडले पाटील, मनोज माळकर, दिनेश मेंगडे, रवींद्र खरात, राम कोंडीलकर, तुषार रोठे, प्रथमेश रांगोळे, जयेश मिस्त्री आदी कलावंतांची आणि माध्यमकर्मीची लक्षवेधी उपस्थिती होती.

जयवंत वाडकर यांच्या सौभाग्यवती विद्या यांनी ‘वऱ्हाडी वाजंत्री’चे देखणे मुखपृष्ठ असलेला खास केक प्रिमिअरसाठी तयार केला होता. या सोळ्यासाठी लोकप्रिय विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार, नानूभाई जयसिंघनानी, सतीश रणदिवे, पितांबर काळे, पद्मश्री कदम, सरोज पाटकर, शार्दूल पाटकर, विद्या वाडकर, स्वामींनी वाडकर, विजय राणे, , अभिजित केंडे इत्यादी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली होती. निर्माते कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्या पाठबळामुळे आम्हां २१ प्रमुख कलाकारांचे आणि १०० हुन अधिक तंत्रज्ञांचे स्वप्न आज साकार झाले आहे, असे उद्गार दिग्दर्शक विजय पाटकर यांनी या प्रसंगी बोलताना काढले.

अनोखी अभिनयशैली, मिश्किल खुमासदार संवादफेक करीत महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार मकरंद अनासपुरे या चित्रपटातून रसिकांच्या चेहऱ्यावर निखळ हास्य फुलवणारा हाय व्होल्टेज कॅामेडी ड्रामा घेऊन आला आहे. या चित्रपटात शंभराव्या लग्नाचा टास्क पूर्ण करण्यासाठी तो सज्ज झाला असून लोकप्रिय विनोदी अभिनेते आणि दिग्दर्शक विजय पाटकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’ची निर्मिती कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्यासह अतुल राजारामशेठ ओहोळ यांनी स्वराज फिल्म प्रॉडक्शन द्वारे केली आहे.

वैभव अर्जुन परब लिखित “वऱ्हाडी वाजंत्री” या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेल्या मकरंद अनासपुरेंसोबत जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, रीमा लागू, पंढरीनाथ कांबळी, हेमांगी कवी, विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे, गणेश रेवडेकर, प्रभाकर मोरे, राजेश चिटणीस, प्रशांत तपस्वी, विनीत बोंडे, जयवंत भालेकर, शिवाजी रेडेकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे इत्यादी कलाकार आहेत. संगीतकार अविनाश विश्वजित, शशांक पोवार यांनी संगीत दिले असून गीतकार राजेश बामगुडे यांच्या गीतांवर गायक आदर्श शिंदे, आनंदी जोशी, मैथिली पानसे-जोशी, नंदू भेंडे, गणेश चंदनशिवे यांनी स्वरसाज चढवला आहे. तर त्यावर नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव, राजेश बिडवे यांनी केले आहे.

Share your valuable opinion

%d bloggers like this: