‘वऱ्हाडी वाजंत्री’ घेऊन मकरंदची लग्नशंभरी!

अनोखी अभिनयशैली, संवादफेक आणि बोलीभाषेच्या बळावर महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार मकरंद अनासपुरेनं महाराष्ट्रापासून थेट विदेशापर्यंत आपला वेगळा चाहतावर्ग तयार केला आहे. विनोदी व्यक्तिरेखांसोबतच धीरगंभीर भूमिकांनाही न्याय देण्यात पटाईत असणारा मकरंद आता रसिकांच्या चेहऱ्यावर निखळ हास्य फुलवणारा हाय व्होल्टेज कॅामेडी ड्रामा घेऊन आला आहे. ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या आगामी मराठी चित्रपटात मकरंदचं एक वेगळं रूप पहायला मिळणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झळकलेल्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’च्या पोस्टरवर तोंडावर हाताचं बोट ठेवलेला मकरंद सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटात मकरंदनं ठरवलेल्या शंभराव्या लग्नाची अनोखी गोष्ट प्रेक्षकांना पहायला मिळेल.

प्रसिद्ध विनोदी अभिनेते आणि दिग्दर्शक विजय पाटकर दिग्दर्शित ११ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणाऱ्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’ची निर्मिती कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्यासह अतुल राजारामशेठ ओहळ यांनी स्वराज फिल्म प्रॉडक्शन या बॅनरखाली केली आहे. विनोदाचा बादशहा मकरंद अनासपुरे या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ‘वऱ्हाडी वाजंत्री’बाबत मकरंद म्हणाला की, या चित्रपटात मी साकारलेल्या जगनकुमारला लग्न जुळवण्याचा नाद आहे. हे त्याचं शंभरावं लग्न आहे. लग्न म्हटलं की आनंदसोहळा… दोन जीवांचं मिलन होणं असतं. दोघांची आयुष्य गाठ बांधणं असतं. त्यासोबतच दोन परिवारांचा मिलाफ असतो. वधुवरांसाठी या आयुष्यभराच्या आठवणी असतात. वैभव परबनं ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या शीर्षकांतर्गत याचं अर्कचित्र लिहिलं आहे. विजय पाटकर हे माझ्या आवडीचे दिग्दर्शक आहेत. आम्ही यापूर्वी केलेला ‘सासू नंबरी जावई दस नंबरी’ हा चित्रपट यशस्वी झाला आहे. विजय पाटकरांचा विनोदाचा सेन्स अप्रतिम आहे. अभिनयासोबत तो उत्तम दिग्दर्शक आणि एडीटरही असून, संगीताचंही त्याला चांगलं ज्ञान आहे. त्यानं २१ कलाकारांची यशस्वी मोट बांधली आहे. आजोबाने नातवाला मांडीवर बसवून पहावा असा अप्रतिम कौटुंबिक सिनेमा अनेक वर्षांनी पहायला मिळणार आहे. अलीकडच्या काळातील बोल्ड आणि शिवराळ कंटेंटमुळे सिनेमा बघायचा की नाही याबाबत लोकं थोडे कन्फ्युज होतात. हा चित्रपट सहकुटुंब-सहपरिवाराला मनमुराद हसवणारा आहे.

Share your valuable opinion

%d bloggers like this: