विजय पाटकरांसोबत ‘वऱ्हाडी वाजंत्री’ देणार विनोदाचं टॉनिक!

‘आमचा हसवण्याचा धंदा…’ हे ब्रीद जपत विनोदवीर – दिग्दर्शक विजय पाटकरांनी नेहमीच रसिकांना विनोदाचं टॅानिक देण्याचं काम केलं आहे. ११ नोव्हेंबरला प्रदर्शित होणारा ‘वऱ्हाडी वाजंत्री’ हा पाटकरांनी दिग्दर्शित केलेला आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांना पोट धरून हसवणार आहे. निर्माते कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर  यांच्यासह  यांसह अतुल राजारामशेठ ओहळ यांनी स्वराज फिल्म प्रॉडक्शन या बॅनरखाली तयार झालेल्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’मध्ये रसिकांना मराठीतील आघाडीच्या कलाकारांची मांदियाळीच पहायला मिळणार आहे. या निमित्तानं मातब्बर कलावंतांच्या अभिनयाची जुगलबंदीच रसिक दरबारी सादर होणार आहे.

खरं तर एकाच चित्रपटात आघाडीच्या इतक्या कलाकारांना एकत्र आणणं आणि त्यांची मर्जी जपत यशस्वीपणे चित्रपट पूर्ण करणं हा खरं तर दिग्दर्शकासाठी एक मोठा टास्कच असतो. हा टास्क पूर्ण करण्याबाबत विजय पाटकर म्हणाले की, ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटात इतक्या कलाकारांना एकत्र घेऊन काम करणं हा खरं तर एक मोठा टास्क होता, पण यात काम केलेले सर्व मित्र असल्यानं सोपं गेलं. मोहन जोशी आणि रिमासोबत पहिल्यांदा काम केलं, पण इतरांसोबत कधी ना कधी स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटाकडे आम्ही काम म्हणून न पाहता एक गंमत म्हणून पाहिल्यानं तोच रंग चित्रपटातही उतरला आहे. प्रेक्षकांनाही त्याची जाणीव होईल. कॅामेडी हा माझा श्वास असल्यानं कॅामेडी चित्रपट करायला आवडतात. वैभव परब या लेखकानं अर्कचित्र असलेला सिनेमा लिहून दिला. सोपी गोष्ट आणि डबल मिनिंग संवाद नसलेला सिनेमा करायला मजा आली. प्रत्येकाला आपापली रेंज माहित असल्यानं फार कठीण गेलं नाही.

विजय पाटकर यांचा चित्रपट म्हणजे ‘एंटरटेनमेंट’, ‘एंटरटेनमेंट’ आणि ‘एंटरटेनमेंट’. ते म्हणाले “आम्ही जे काही करतो ते रसिकांच्या मनोरंजनासाठी. प्रेक्षकांना त्यांच्या विवंचनांतून बाहेर काढून, दोन घटका सगळं विसरायला लावून त्यांच्या चेहऱ्यावर निखळ हास्य फुलविण्यासाठी माझ्यातील कलावंताची धडपड सुरु असते, ‘वऱ्हाडी वाजंत्री’ मधून हीच धडपड तुम्हाला दिसणार आहे. या चित्रपटातून मी २१ हून अधिक हरहुन्नरी विनोदवीरांची फौज घेवून येत असल्याने खुमासदार रंगत येणारचं.” ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटात मकरंद अनासपुरेसोबत पंढरीनाथ कांबळे, हेमांगी कवी, विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, प्रभाकर मोरे, पूर्णिमा अहिरे, सुनील गोडबोले, प्रशांत तपस्वी,  राजेश चिटणीस, विनीत बोंडे, गणेश रेवडेकर, जयवंत भालेकर, शिवाजी रेडकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहापुरे, साक्षी परांजपे आदी कलाकार आहेत.

Share your valuable opinion

%d bloggers like this: